नंदकिशोर नौटियाल यांचे विचार समाजाला प्रेरणा देतील-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ज्येष्ठ विचारवंत स्व.नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ कादंबरीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई :- ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे झाले. यावेळी माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. सूर्यबाला, ज्येष्ठ कथाकार भूपेंद्र पंड्या, राजीव नौटियाल मंचावर उपस्थित होते. नवनीतचे संपादक व कवी डॉ. विश्वनाथ सचदेव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, स्व. नंदकिशोर नौटियाल हे एक चांगले साहित्यिक, लेखक, विचारवंत आणि पत्रकार होते. त्यांचे विचार या पुस्तकातून समाजाला प्रेरणा देतील. सध्या समाजात पुस्तक खरेदी करून ते वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे . त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्याची गरज आहे. यावेळी स्व. नौटियाल यांच्या ‘नूतन सबेरा’ या साप्ताहिकाला राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

प्रमुख पाहुणे नवनीतचे संपादक विश्वनाथ सचदेव यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की ते एक प्रामाणिक, अनुभवी आणि मूल्यवर्धित पत्रकारितेचे पुरस्कृत करणाऱ्या पैकी एक होते. ज्येष्ठ कथाकार सुर्यबाला यांनी सांगितले की कांदबरीकार होणे इतके सोपे नाही. नौटियाल यांचे हे नवीन रूप अचंबित करणारे आहे. कथावाचक भूपेंद्र पंड्या म्हणाले की जेव्हा नौटियाल जी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत रामकथेचे आयोजन केले होते तेव्हा 30 लाख लोक उपस्थित राहिले होते त्यावेळी त्यांच्या आस्तिकवादी रुपाचा प्रत्यय आला होता. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह म्हणाले की नौटियाल जी यांनी नेहमीच प्रत्येकाला मदत केली, त्यांचे उपकार समाज कधी विसरणार नाही.

यावेळी रुक्मिणी नंदकिशोर नौटियाल, अनिल त्रिवेदी, अनिल गलगली, सुबोध शर्मा, अनुराग त्रिपाठी, बीआर भट्टड, हरि मृदुल, जगदीश पुरोहित, एस. पी. तुलसियन, अरविंद तिवारी सहित अन्य मान्यवर उपस्थित होते. नूतन सवेराचे व्यवस्थापकीय संचालकप राजीव नौटियाल यांनी सर्व पाहुण्याचे आभार मानले. सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले. आभार भरत नौटियाल यांनी मानले.